माझ्या नवऱ्याची बायको ' या मालिकेत आता जुनी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील परतणार आहे. त्यामुळे शनायाची भूमिका साकारणारी इशा केसकर ही मालिका सोडतेय. पण आता अचानक इशा केसकरच्या जागी रसिका सुनील का परततेय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं आहे.जवळपास तीन महिन्यांनंतर मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेची शूटिंग नाशिकमधल्या एका रिसॉर्टमध्ये होते. मात्र इशा केसकरच्या दाढेचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला दिलेल्या शूटिंगच्या तारखांना हजर राहणं शक्य होत नव्हतं. तिच्यामुळे मालिकेची शूटिंगसुद्धा थांबवता येणार नव्हती. त्यामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असं ती या व्हिडीओत सांगतेय.राधिका आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारात मिठाचा खडा बनलेली शनाया अर्थात रसिकाने काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून बाहेर पडली होती. तिच्या जागी इशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत परतणार आहे. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिका परदेशी गेली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. मालिकेत रसिकाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांचा त्याचा उत्तम प्रतिसाद मिळत होता